पुण्यात गणेशोत्सवात सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवास शनिवारपासून सुरुवात होणार आहे.
या कालावधीत संभाव्य दहशतवादी, कारवाया आणि अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात शहरात राज्याच्या विविध भागातून आणि परदेशातील नागरिक दर्शनासाठी येतात. चोरट्यांकडून दरवर्षी गर्दीत भाविकांचे मोबाईल, दागिने चोरीच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.
भाविकांसाठी मदत केंद्रे शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांसाठी पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, काही प्रमुख चौकांमध्ये मनोऱ्यावरून गर्दीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या बाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निश्चित होऊन शहरातील गर्दीत फिरता येणार आहे.